अलिबाग (प्रतिनिधी) : जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त अलिबाग येथील जिल्हा क्रीडा संकुलात ऑलिम्पिक मशाल रॅलीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग तसेच प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग आणि कुलाबा क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला खेळाडू व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रॅलीमध्ये विविध खेळांचे खेळाडू, क्रीडाप्रेमी, कुलाबा क्रीडा प्रबोधिनीचे विद्यार्थी, स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी तसेच प्रिझम संस्थेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ऑलिम्पिक चळवळीचे महत्त्व, खेळांमधील एकता, शांतता आणि जागतिक बंधुत्वाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या रॅलीमागे होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ऑलिम्पिक मशालीचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक संदीप गुरव, आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा भारत सरकारचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी नंदकुमार गोंधळी, आंतरराष्ट्रीय खेळाडू व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या क्रीडा मार्गदर्शिका भक्ती तिवारी, सुरेंद्र पाटील तसेच क्रीडा मार्गदर्शक यतीराज पाटील उपस्थित होते.
या मशाल रॅलीद्वारे युवकांमध्ये क्रीडासंस्कार, शिस्त, संघभावना आणि उत्तम आरोग्याचे महत्त्व रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर सकाळच्या सत्रात जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्या उपस्थितीत परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात तालुका क्रीडा समितीचे प्रमुख समन्वयक सहभागी झाले होते.
परिसंवादात ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देणे तसेच भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम खेळाडू घडविण्याबाबत विचारमंथन करण्यात आले. लहान वयात योग्य प्रशिक्षण, सुविधा आणि मार्गदर्शन मिळाल्यास खेळाडूंना जागतिक स्तरावर यश संपादन करता येऊ शकते, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे युवकांमध्ये क्रीडाविषयक जागरूकता वाढण्यास मदत झाली असून, ऑलिम्पिक मूल्यांचा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले.






