रायगड( प्रतिनिधी): भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, तळा आणि पोलादपूर या सहा तालुक्यांतील सर्व शाळांना गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर केली आहे.
हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार १ व २ जुलै रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच संबंधित तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशानुसार अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना २ जुलै रोजी सुटी राहणार आहे. मात्र, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेनुसार कार्यालयात उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाज करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुटी जाहीर करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार हवामान विभागाच्या इशाऱ्याचा आणि तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले व समुद्रकिनारी जाणे टाळावे तसेच प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.





