आदिशक्ती पुरस्कारात वाडगाव ग्रामपंचायतीची राज्यात प्रथम कामगिरी


अलिबाग (प्रतिनिधी): महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती पुरस्कार २०२५-२६’ मध्ये ग्रुप ग्रामपंचायत वाडगाव (ता. अलिबाग) यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून रायगड जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे. ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरण, बालकल्याण, लोकसहभाग आणि विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ग्रुप ग्रामपंचायत वाडगावचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व ग्रामस्थांचे अभिनंदन केले. ग्रामपंचायतीने भविष्यातही महिला व बालकल्याणाच्या विविध उपक्रमांना अधिक प्रभावीपणे राबवून राज्यासाठी आदर्श निर्माण करावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
या राज्यस्तरीय यशामुळे वाडगाव ग्रामपंचायतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ग्रामविकासाच्या क्षेत्रात ही कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे. महिला व बालकल्याणासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची राज्य शासनाने घेतलेली दखल ही संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.