शेकापच्या वर्धापनदिनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात; खालापूरमध्ये लाल बावट्याचे वादळ धडकणार


खालापूर (प्रतिनिधी): शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त खालापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लाल बावट्याचे सैनिक मोठ्या संख्येने खालापूरकडे रवाना होत असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वर्धापनदिनानिमित्त होणाऱ्या या मेळाव्यात पक्षाची भूमिका, आगामी राजकीय दिशा आणि संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

यावेळी विविध विरोधी पक्षांतील प्रमुख नेतेही व्यासपीठावर उपस्थित राहणार असून राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर ते जोरदार टीका करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

कार्यक्रमस्थळी मंडप, बैठक व्यवस्था, वाहतूक, सुरक्षा आणि अन्य सुविधांची तयारी पूर्णत्वास आली असून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खालापूरमध्ये शेकापच्या शक्तिप्रदर्शनाची रंगीत तालीम पाहायला मिळणार आहे.