१५ ऑगस्ट रोजी ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा


रायगड (प्रतिनिधी): भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण देशभर उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त रायगड जिल्ह्यातही विविध शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांसह शैक्षणिक संस्थांमध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री ना. श्री. भरत विठ्ठल मारुती गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित राहणार आहेत.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, देशभक्तीपर कार्यक्रम आणि मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे होणार आहेत. स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाच्या विकासासाठी नागरिकांनी आपले योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच शाळा-महाविद्यालयांमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तिरंगा ध्वज, देशभक्तीपर गीतांमुळे जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनाचा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करताना संविधानिक मूल्ये, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प या निमित्ताने केला जाणार आहे.