अलिबाग (प्रतिनिधी): दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेढांबे येथे खारेपाठ गोविंदा पथक तसेच पेढांबे महिला व पुरुष गोविंदा पथकाच्या टी-शर्ट अनावरण सोहळ्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, गोविंदा पथकातील सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली.
या सोहळ्यास रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा प्रतोद अमितदादा नाईक तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हाप्रमुख अमीर ठाकूर (पिंट्या) यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते गोविंदा पथकाच्या टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. यावेळी महिला आणि पुरुष गोविंदा पथकातील सहभागी सदस्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
दहीहंडी हा केवळ उत्सव नसून संघभावना, शिस्त, साहस आणि एकजुटीचा संदेश देणारी परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर पेढांबे येथील महिला व पुरुष गोविंदा पथकांनी उत्सवासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. टी-शर्ट अनावरण सोहळ्यामुळे पथकातील सदस्यांचा उत्साह आणखी वाढला.
यावेळी स्थानिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी गोविंदा पथकातील महिला व पुरुष सहभागींच्या उत्साहाचे कौतुक केले. तसेच दहीहंडी उत्सवात सुरक्षिततेला प्राधान्य देत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होण्याचे आवाहन करत पथकाच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या निमित्ताने पेढांबे परिसरात दहीहंडी उत्सवाची रंगत वाढली असून, यंदा खारेपाठ गोविंदा पथक तसेच पेढांबे महिला व पुरुष गोविंदा पथकाच्या कामगिरीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.








