रेवस-रेड्डी मार्गावरील पुलांच्या जोडरस्त्यांना गती द्या; तटकरे यांचे प्रशासनाला निर्देश


अलिबाग (प्रतिनिधी) : रेवस-रेड्डी सागरी मार्गाच्या कामाला गती देण्यासाठी पुलांच्या जोडरस्त्यांची कामे तसेच भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार सुनील तटकरे यांनी प्रशासनाला दिले. रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील विविध विकासकामांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील प्रस्तावित पुलांच्या कामांची सद्यस्थिती, त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे आणि भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. भूसंपादनाच्या कामाला होत असलेल्या विलंबाबाबत तटकरे यांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील कामांना विलंब होऊ नये, यासाठी भूसंपादनाशी संबंधित अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

रेवस-रेड्डी मार्ग हा रायगडच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असून, या मार्गामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यासोबतच पर्यटन आणि औद्योगिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत भूसंपादनाची कामे रखडू नयेत आणि प्रकल्पाच्या पुढील कामांना लवकर सुरुवात होईल, यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

पेण, रोहा रेल्वे स्थानकांचा विमानतळाच्या धर्तीवर विकास

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील पेण आणि रोहा रेल्वे स्थानकांच्या विकासाबाबतही तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली. दोन्ही रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येणार असून, विमानतळाच्या धर्तीवर आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी स्थानके विकसित करण्याचे नियोजन आहे.

रोहा रेल्वे स्थानकाच्या विकासकामाची निविदा येत्या काही दिवसांत प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर पेण रेल्वे स्थानकाच्या कामाची निविदाही काही दिवसांनी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली. या विकासकामांमुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासोबतच दोन्ही स्थानकांचे स्वरूपही बदलणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम

कोकण रेल्वे मार्गावरील विविध रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याची कामेही हाती घेण्यात आली आहेत. गोरेगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. नागोठणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मच्या उंची वाढीचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

रेवस-रेड्डी सागरी मार्गासह पेण, रोहा आणि कोकण रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे रायगड जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. या सर्व प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी वेगाने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली.