पेणमध्ये ६५ बौद्धिक दिव्यांग मुलांचा उत्स्फूर्त सहभाग; पाण्याच्या फवाऱ्यांत फुलला निरागस आनंद
पेण (किरण बांधणकर): दहीहंडीचा उत्सव म्हटला की, उंचच उंच मानवी मनोरे, गोविंदांचा जल्लोष आणि ढोल-ताशांचा गजर असे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, पेणमध्ये याच उत्सवाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड देत बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी विशेष दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. येथील ‘आई डे केअर’ संस्थेतील ६५ विशेष मुलांनी या दहीहंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत हंडी फोडण्याचा आनंद अनुभवला. रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा राजू पिचिका यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील पहिल्या विशेष दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले.
सामान्य मुलांप्रमाणेच विशेष मुलांनाही सण-उत्सवांचा मनमुराद आनंद घेता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उत्सवात सहभागी झालेल्या मुलांनी एकमेकांना साथ देत हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि दहीहंडी फोडल्यानंतर मुलांनी एकच जल्लोष केला.
ढोल-ताशांचा गजर, उत्साहवर्धक संगीत आणि पाण्याच्या फवाऱ्यांनी संपूर्ण परिसर आनंदाने न्हाऊन निघाला. पाण्यात चिंब भिजत नाचणाऱ्या विशेष मुलांच्या चेहऱ्यांवरील निरागस हास्याने उपस्थितांची मने जिंकली. कोणताही संकोच न बाळगता मुलांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला. या मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंदच या उपक्रमाचे खरे यश ठरले.
‘आई डे केअर’ संस्था बौद्धिक दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवत असते. समाजातील प्रत्येक सण आणि उत्सवात या मुलांना समानतेने सहभागी होता यावे, यासाठी संस्थेकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यामुळे विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम या माध्यमातून होत आहे.
याबाबत ‘आई डे केअर’च्या स्वाती मोहिते आणि महेंद्र मोहिते यांनी सांगितले की, “गेल्या १५ वर्षांपासून रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे राजू पिचिका आमच्या मुलांना दहीहंडी फोडण्याचा मान देत आहेत. या उपक्रमामुळे विशेष मुलांना इतर मुलांप्रमाणेच उत्सवाचा आनंद घेता येतो. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला समाधान आणि अभिमान वाटतो.”
दरम्यान, कार्यक्रमाच्या समारोपानंतर रामेश्वर कन्स्ट्रक्शनच्या वतीने दहीहंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. विशेष मुलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या दहीहंडीमुळे पेणमध्ये उत्सवाला सामाजिक समतेची आणि माणुसकीची किनार लाभली. ‘विशेष’ मुलांना वेगळे न ठेवता त्यांनाही आनंदाच्या प्रत्येक क्षणात सहभागी करून घेण्याचा संदेश देणारा हा उपक्रम पेणकरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.









