पालिकेच्या सभागृहात रेल्वे प्रशासनाकडून प्रस्तावित विकासकामांचे प्रात्यक्षिक; रामवाडी रेल्वे पूलाच्या प्रस्तावालाही सकारात्मक प्रतिसाद
पेण(किरण बांधणकर): कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या पेण रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. प्रवाशांच्या सोयी-सुविधांचा विचार करून स्थानकाचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण व विकास करण्यात येणार असून, आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर सुसज्ज स्थानक उभारण्याचा प्रस्ताव आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे पेण नगरपालिका आणि स्थानिक प्रवाशांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पेण रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित नूतनीकरण व विकासकामांबाबत खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पेण नगरपरिषदेच्या सभागृहात रेल्वे अधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रस्तावित स्थानकाच्या विकास आराखड्याचे प्रात्यक्षिक छायाचित्रे व संकल्पनेच्या माध्यमातून सादर करण्यात आले. स्थानक कोणत्या पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे, याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिली.
गणेशमूर्तीच्या संकल्पनेवर स्थानकाचा विकास
पेण शहराची देशभरातील गणेशमूर्तींसाठी असलेली ओळख लक्षात घेऊन रेल्वे स्थानकाच्या विकास आराखड्यात गणेशमूर्तीची संकल्पना समाविष्ट करण्याच्या सूचना खासदार सुनील तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ गणपती बाप्पाची आकर्षक मूर्ती उभारण्याची संकल्पनाही मांडण्यात आली. पेणची गणेशमूर्ती कलेची परंपरा आणि सांस्कृतिक ओळख देशभर पोहोचविण्याच्या दृष्टीने या संकल्पनेला महत्त्व देण्यात येणार आहे.
सध्या पेण रेल्वे स्थानकाची अवस्था प्रवाशांच्या दृष्टीने समाधानकारक नसल्याने त्याचा सर्वंकष विकास करण्याची मागणी सातत्याने होत होती. स्थानकाचे सुशोभीकरण, प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा आणि आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रस्तावित आराखडा तयार करण्यात आला आहे.
रामवाडी रेल्वे पूलाचा प्रस्ताव
दरम्यान, पेण शहरालगतच्या रामवाडी परिसरात जाण्यासाठी नागरिकांना मुंबई-गोवा महामार्गाचा वापर करावा लागतो. या मार्गावरून पादचारी तसेच वाहनचालकांना प्रवास करताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. हा प्रवास धोकादायक ठरत असल्याने पेण ते रामवाडी दरम्यान रेल्वे मार्गावर पूल उभारण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील आणि नगरसेवक निळकंठ म्हात्रे यांनी खासदार सुनील तटकरे तसेच रेल्वे अधिकाऱ्यांसमोर पुलाचा प्रस्ताव मांडला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा पूल महत्त्वाचा असल्याचे सांगण्यात आले. या प्रस्तावाला खासदार तटकरे आणि रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पालिकेच्या सभागृहाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव
या बैठकीदरम्यान पेण नगरपरिषदेच्या नूतनीकरण करण्यात येणाऱ्या सभागृहाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांना पेणमधून ५० हजारांचे मताधिक्य देण्याचा शब्द आमदार रवीशेठ पाटील यांनी स्व. अजितदादा पवार यांना दिला होता. हा शब्द पाळल्यानंतर पेण शहराच्या रस्ते विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन अजितदादा पवार यांनी दिले होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिलेला शब्द पाळला. मात्र, अजितदादा पवार आज आपल्यात नसल्याने त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात, या भावनेतून पेण नगरपरिषदेच्या नूतनीकरण होणाऱ्या सभागृहाला त्यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला. या निर्णयाची घोषणा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
या बैठकीला नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, सभापती कलावती पाटील, आफ्रीन अखवारे, आनंद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दयानंद भगत, जितेंद्र ठाकूर, ललित पाटील, राजू पिच्चिका, नगरपरिषदेचे सभापती व नगरसेवक, रेल्वे अधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पेण रेल्वे स्थानकाचा प्रस्तावित विकास, गणेशमूर्तीच्या संकल्पनेचा समावेश आणि रामवाडी रेल्वे पूलाच्या प्रस्तावाला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे पेणच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









