‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ : ९व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ


मुंबई (प्रतिनिधी) : एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प योजनेअंतर्गत ९व्या राष्ट्रीय पोषण माहाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उत्साहात संपन्न झाला. यंदाचा पोषण माह ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित असून, राज्यातील अंगणवाडी केंद्रे अधिक सक्षम, सुसज्ज आणि प्रभावी करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

या राज्यस्तरीय शुभारंभ सोहळ्यास महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित मान्यवर उपस्थित होते.

गेल्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ८व्या राष्ट्रीय पोषण माहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वर्धा, हिंगोली आणि नागपूर जिल्हा कार्यालयांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच एकात्मिक बालविकास सेवा विभागाच्या नव्या रंगीत लोगोचे, वेबपेजचे आणि ‘पोषण आहार प्रार्थने’चे उद्घाटनही या सोहळ्यात करण्यात आले.

यंदाच्या पोषण माहाच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांच्या बळकटीकरणासोबतच बालक, गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः डिजिटल अंगणवाड्यांमधील स्क्रीनचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

डिजिटल अंगणवाड्यांमध्ये आयुष विभागामार्फत तयार करण्यात आलेले आरोग्य व पोषणविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ नियमितपणे दाखवावेत, तसेच या व्हिडिओमधून मिळणारी आरोग्य व पोषणविषयक माहिती गरोदर आणि स्तनदा मातांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

अंगणवाडी ही केवळ बालकांच्या संगोपनाची जागा नसून, बालकांचे आरोग्य, पोषण, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच मातांच्या आरोग्यविषयक जनजागृतीचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून समाजाचा सहभाग वाढवून अंगणवाडी केंद्रांना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय पोषण माहाच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलन, सकस आहार, आरोग्यदायी जीवनशैली आणि माता-बाल आरोग्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.