अत्याधुनिक व्यायामशाळेचेही उद्घाटन; खासदार केसरी कुस्ती स्पर्धेत मल्लांनी गाजवला आखाडा
अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील वाडगाव ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या खासदार सुनील तटकरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र आणि स्व. दिलीप आंग्रे सार्वजनिक व्यायामशाळेचे लोकार्पण रविवारी खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वागत कमानीचेही उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खासदार केसरी कुस्ती स्पर्धेने परिसरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
देशाच्या विविध भागांतून आलेल्या निमंत्रित मल्लांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. दमदार डावपेच, चित्तथरारक झटापटी आणि ताकदीच्या प्रदर्शनामुळे कुस्तीचा आखाडा चांगलाच रंगला. दोन नामांकित मल्लांमध्ये झालेल्या प्रदर्शनीय कुस्ती सामन्यालाही उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
स्पर्धेत पै. मंजीत खत्री यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाची गदा आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले. पै. कालीचरण सोलनकर यांनी द्वितीय क्रमांक मिळवत मानाची गदा व ७५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. तर पै. हर्षद लोमटे यांनी तृतीय क्रमांक मिळवत मानाची गदा आणि ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.
यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, क्रीडांगणे खेळाडूंच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू पाडण्याचे काम करतात. मैदानावरून संघभावना निर्माण होते, तर खेळाच्या माध्यमातून जीवनातील अनेक महत्त्वाचे धडे शिकता येतात. वाडगाव येथे सुरू झालेल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून दर्जेदार मल्ल घडावेत आणि त्यांनी रायगडचे नाव देश-विदेशात उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अलिबाग परिसराला भजन-कीर्तनासोबतच क्रीडा क्षेत्राचीही समृद्ध परंपरा लाभली आहे. नव्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रामुळे या परंपरेला आणखी चालना मिळेल आणि ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना सरावासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, चारुहास मगर, प्रतोद अमित नाईक, सरचिटणीस प्रवीण ठाकूर, उपसरपंच जयेंद्र भगत यांच्यासह ग्रामस्थ, कुस्तीप्रेमी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









