रायगड (प्रतिनिधी): गणेशोत्सवाशी निगडित श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जतन करण्यासाठी त्याचे डिजिटल दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवातील विविध उपक्रमांची माहिती ‘Bappa.org’ या डिजिटल माध्यमाच्या माध्यमातून जगासमोर आणावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हावासीयांना केले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा महत्त्वपूर्ण उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून विविध भागांतील स्थानिक प्रथा, रूढी, श्रद्धा आणि कलापरंपरा जपल्या जातात. मात्र, काळानुसार या परंपरांमध्ये बदल होत असून अनेक पारंपरिक गोष्टी लोप पावण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे योग्य पद्धतीने संकलन आणि डिजिटल स्वरूपात जतन करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले.
घरगुती किंवा सार्वजनिक गणेश मंडळातील आरतीचे ध्वनिचित्रमुद्रण, गणेशोत्सवाची छायाचित्रे, पारंपरिक नैवेद्य व पाककृती तसेच गणेशोत्सवाशी संबंधित स्थानिक परंपरा, प्रथा आणि आठवणी ‘Bappa.org’च्या माध्यमातून नोंदवाव्यात. यामुळे रायगडसह विविध भागांतील गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरांचा डिजिटल ठेवा निर्माण होण्यास मदत होईल.
“श्रद्धा आणि परंपरांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करून हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करणे आवश्यक आहे. जिल्हावासीयांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आपल्या घरातील आणि मंडळातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जगासमोर आणाव्यात,” असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.









