हंगामपूर्व तांत्रिक कामांसाठी निर्णय; पर्यटकांना पायरी मार्गानेच गडावर जाता येणार
रायगड (प्रतिनिधी): रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटक आणि दुर्गप्रेमींसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. हंगामपूर्व तांत्रिक कामे आणि देखभालीच्या पार्श्वभूमीवर रायगड रोपवे सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रोपवे सेवा बंद असण्याच्या कालावधीत पर्यटकांना रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी केवळ पायरी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
रोपवेच्या सुरक्षित आणि सुरळीत संचालनासाठी आवश्यक असलेली हंगामपूर्व कामे करण्यात येत आहेत. या कामांमुळे काही काळ रोपवे सेवा उपलब्ध राहणार नसल्याने रायगडला भेट देणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
याबाबत रायगड रोपवे प्रशासनाचे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. हंगामपूर्व तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर रोपवे सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत नागरिकांना अधिकृतपणे सूचित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तांत्रिक कामांमुळे पर्यटकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच पर्यटक आणि दुर्गप्रेमींनी रोपवे सेवा बंद असल्याची नोंद घेऊन आपल्या रायगड भेटीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी प्रवासाचे नियोजन करताना रोपवे सेवा उपलब्ध आहे की नाही, याची अधिकृत माहिती तपासूनच रायगडला यावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.









