विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ; वृक्षारोपणासह विविध उपक्रमांचे आयोजन
अलिबाग (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत झिराड येथे विविध उपक्रमांच्या आयोजनातून करण्यात आला.
या अभियानांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे, लोकसहभागातून विकासकामांना चालना देणे तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. झिराड येथे आयोजित कार्यक्रमात वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर घरकुल योजना, महिला बचत गटांसह विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, गटविकास अधिकारी शर्मिला पाटील, ग्रुप ग्रामपंचायत झिराडचे प्रशासक अरुण माळी, ग्रामसेवक संजय पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
‘सेवा संकल्प अभियान’ च्या माध्यमातून ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात आला आहे.









