“प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यापेक्षा काळ उत्तर देतो”; महेंद्र दळवींच्या टीकेवर संयमी प्रतिक्रिया
रायगड (प्रतिनिधी): कोकणातील सत्तेतील मित्रपक्षांमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेला राजकीय संघर्ष अद्यापही पूर्णपणे थांबलेला नसल्याचे चित्र आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी संयमी भूमिका घेत प्रतिक्रिया दिली आहे. “प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्यापेक्षा काळ उत्तर देतो,” असे स्पष्ट करत त्यांनी दळवींच्या वक्तव्यांवर अधिक भाष्य करणे टाळले.
आपल्या राजकीय कारकिर्दीतील संघर्षाचा संदर्भ देताना तटकरे म्हणाले की, १९७६ पासून आपण राजकारणात सक्रिय असून त्यावेळीही मोठ्या प्रमाणावर राजकीय संघर्ष अनुभवला आहे. शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अनेकदा रस्त्यावरही झाला. मात्र, त्या काळात राजकीय मतभेद असूनही काही मर्यादा पाळल्या जात होत्या.
अलीकडच्या काळातील वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेबद्दल तटकरे यांनी खंत व्यक्त केली. “माझ्याकडून कधीही कोणाबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात आलेली नाही. काही वेळा प्रतिक्रिया दिली असली तरी समोरच्या व्यक्तीच्या वडिलांबद्दल किती बोलावे, याचीही एक मर्यादा असते,” असे त्यांनी सांगितले.
राजकारण हे सतत प्रवाही असते. काळानुसार राजकीय समीकरणे, पक्ष आणि भूमिका बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक वक्तव्याला तत्काळ प्रत्युत्तर देण्यापेक्षा परिस्थितीला वेळ देणे योग्य असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
“काळाच्या ओघात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्यामुळे आजच्या या चर्चेवर अधिक भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही. ज्याला ज्या वेळी जे वाटते, ते तो बोलतो. प्रत्येकाची विचारशक्ती आणि त्याची जडणघडण वेगळी असते,” असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.
दळवी यांनी तटकरे भाजपमध्ये जाणार असल्याचे केलेले वक्तव्य तसेच त्यांच्यावर केलेल्या इतर राजकीय टीकेच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी थेट प्रतिउत्तर देण्याचे टाळत संयमाची भूमिका घेतल्याने रायगडच्या राजकारणातील या संघर्षाकडे आता लक्ष लागले आहे.









