नवगाव येथील भवानी माता मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न


शेकाप सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकारली भव्य वास्तू

अलिबाग ( प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे शिवज्योती मित्र व महिला मंडळाच्या पुढाकारातून भवानी माता मंदिराचा जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला शेकापचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवगाव येथील भवानी माता मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे मंदिराला भव्य आणि सुसज्ज स्वरूप प्राप्त झाले आहे. ग्रामस्थांची एकजूट, शिवज्योती मित्र व महिला मंडळाचे नियोजन, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि दानशूर व्यक्तींनी दिलेले योगदान यांच्या बळावर ही सुंदर वास्तू साकारण्यात आली. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या सोहळ्याला शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, शेकापच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, कामगार आघाडीचे नेते प्रदीप नाईक, उद्योजिका, दानशूर व्यक्तिमत्व कविता सिंह, एकविरा देवी ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रमोद घासे, आगरी माळी समाजाचे अध्यक्ष अरुण कवळे, सरपंच अंकिता जैतू, उपसरपंच तथा शिवज्योती मित्र व महिला मंडळाचे उपाध्यक्ष निखिल कवळे, शिवज्योती मित्र व महिला मंडळाचे अध्यक्ष मधुकर घासे, सचिव समीर राऊत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार भाई जयंत पाटील म्हणाले की, “नवगाव हे माझे आवडते गाव आहे. येथील ग्रामस्थांनी केलेली मागणी आणि त्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. मग ते मंदिराचे काम असो, रस्त्याचा प्रश्न असो किंवा गावातील इतर विकासकामे असोत, दिलेला शब्द पूर्ण करून दाखवणे ही माझी भूमिका आहे.”

नवगावच्या ग्रामस्थांची आपली कामे मार्गी लावून घेण्याची हातोटी वेगळीच असल्याचे सांगत त्यांनी ग्रामस्थांच्या एकजुटीचे कौतुक केले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन एखादे काम हाती घेतले, तर ते यशस्वीपणे पूर्ण करण्याची ताकद त्यांच्यात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले, “ग्रामस्थांच्या योगदानातून एक भव्य, दिव्य आणि सुसज्ज वास्तू उभी राहिली आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शिवज्योती मित्र व महिला मंडळाचे सर्व सदस्य तसेच दानशूर व्यक्तींनी मोठे योगदान दिले आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच हे काम पूर्णत्वास गेले. अशा प्रकारे गावाच्या विकासासाठी आणि धार्मिक-सामाजिक कार्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.”

भवानी माता मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे नवगावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडली असून, ग्रामस्थांच्या एकजुटीचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. शिवज्योती मित्र व महिला मंडळाने घेतलेला पुढाकार आणि ग्रामस्थांनी दिलेली साथ यामुळे मंदिराला नवे रूप प्राप्त झाले.