अलिबाग (अमुलकुमार जैन): अलिबाग तालुक्यातील नेहुली क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेतील जय-पराजयाच्या वादातून वेश्वी येथील पी.एन.पी. महाविद्यालयासमोरील रस्त्यावर मारहाणीची घटना घडली. अष्टदा सूर्यकांत भगत, विराज जुईकर आणि २० ते २५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत शिक्षक तेजस मोहन म्हात्रे, साहिल अजित भगत, हर्ष श्रीदास म्हात्रे, हर्षित महेश पाटील आणि शिपाई कुणाल प्रभाकर भिंगे असे पाच जण जखमी झाले. हर्षित पाटील याची सोन्याची चेन हरवल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. सायली म्हात्रे हिला धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तेजस म्हात्रे यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा क्रमांक १७६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जिल्हा रुग्णालय व घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.









