६१ कोटींच्या भुयारी गटार योजनेच्या भूमिपूजनावरही उपस्थित केले प्रश्न; विकासकामांच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी
अलिबाग (प्रतिनिधी) :अलिबाग शहरात स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून विविध ठिकाणी स्वच्छतेची कामे सुरू असल्याचे चित्र दाखवले जात असले, तरी श्रीबाग आणि म्हाडा कॉलनी परिसरातील अस्वच्छतेकडे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उबाठा शिवसेनेचे नगरसेवक संदीप पालकर यांनी केला आहे. गटारांची नियमित स्वच्छता, साचलेला कचरा उचलणे आणि शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याची मागणी करत त्यांनी नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
श्रीबाग आणि म्हाडा कॉलनी नगरपालिकेच्या हद्दीत येत नाहीत का?
अलिबाग शहरात स्वच्छता मोहिमा राबवल्या जात असल्याचे सांगितले जात असताना श्रीबाग आणि म्हाडा कॉलनी परिसराकडे मात्र दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल पालकर यांनी उपस्थित केला. श्रीबाग हा सुशिक्षित नागरिकांची वस्ती असलेला परिसर असूनही येथील स्वच्छतेच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
श्रीबाग परिसरालगत असलेल्या गटारांची नियमित स्वच्छता होत नसल्याचे, तसेच मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचे पालकर यांनी निदर्शनास आणून दिले. शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याशी निगडित मूलभूत प्रश्नांकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. नगरपालिका आरोग्य विभाग या समस्यांकडे लक्ष देत आहे की नाही, याचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
६१ कोटींच्या भुयारी गटार योजनेवर प्रश्नचिन्ह
अलिबाग शहरातील ६१ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेच्या भूमिपूजनावरही संदीप पालकर यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेची सुरुवात २०२४ मध्ये झाली होती आणि त्यावेळी आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. असे असताना आता पुन्हा भूमिपूजन करण्यामागील नेमका उद्देश काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यापूर्वी २०११-१२ च्या सुमारासही अलिबाग शहरासाठी भुयारी गटार योजनेचा विषय पुढे आला होता. त्या योजनेचे पुढे काय झाले, तिची अंमलबजावणी कोणत्या टप्प्यापर्यंत झाली आणि आता नव्याने ६१ कोटी रुपयांच्या योजनेचे भूमिपूजन करण्याची आवश्यकता का निर्माण झाली, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी पालकर यांनी केली.
या योजनेबाबत चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र आपण यापूर्वी संबंधित प्रशासनाला दिले असून, जिल्हाधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडेही निवेदन सादर केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या तक्रारीवर नेमकी कोणती कार्यवाही झाली, याची माहिती अद्याप मिळालेली नसल्याचा दावा त्यांनी केला.
विकासकामांच्या गुणवत्तेवर देखरेख आवश्यक
अलिबाग शहरात विविध विकासकामे आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवले जात आहेत. मात्र, केवळ मोठ्या रकमेच्या योजना जाहीर करणे किंवा भूमिपूजनाचे कार्यक्रम आयोजित करणे म्हणजे विकास नव्हे. प्रत्यक्षात सुरू असलेली कामे नियमानुसार, दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण होत आहेत की नाहीत, याची तपासणी होणे गरजेचे आहे, असे पालकर यांनी स्पष्ट केले.
श्रीबाग क्रमांक दोन परिसरातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीच्या कामाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कोणाची आहे, त्यावर कोण देखरेख करत आहे आणि कामाची माहिती नागरिकांना कशा प्रकारे उपलब्ध करून दिली जात आहे, याबाबत स्पष्टता असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विकासकामांना सहकार्य; मात्र पारदर्शकता हवी
अलिबाग शहराच्या विकासासाठी नव्याने येणाऱ्या प्रकल्पांना आपले सहकार्य राहील. मात्र, या योजनांचा उपयोग खऱ्या अर्थाने शहराच्या विकासासाठी होतो आहे की नाही, याची खातरजमा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या प्रत्येक कामाची गुणवत्ता, पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी भूमिका संदीप पालकर यांनी मांडली.
शहराच्या विकासासाठी मोठमोठे प्रकल्प राबवण्याबरोबरच स्वच्छता, पाणीपुरवठा, गटारांची देखभाल आणि सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता या मूलभूत बाबींनाही समान प्राधान्य द्यावे. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष कामांची पाहणी करावी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी पालकर यांनी केली.
अलिबागच्या विकासकामांबाबत नागरिकांना विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार करणे आणि मूलभूत नागरी सुविधांचा दर्जा सुधारणे, हीच आपली अपेक्षा असल्याचे संदीप पालकर यांनी स्पष्ट केले.









