अलिबाग (प्रतिनिधी): गुजरातमधील वापी येथे १० व ११ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेत पीएनपी सायरस पूनावाला सीबीएसई स्कूल, नागाव येथील यूकेजीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या गार्गी गौरव सरनाईक हिने आपल्या कौशल्याची चमक दाखवत दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर तिची इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गार्गी हिने आठ वर्षांखालील वयोगटात सहभाग घेत द्विलाठी आणि द्विअनीका या दोन्ही प्रकारांत अव्वल स्थान पटकावले. लहान वयातच लाठी-काठी या पारंपरिक युद्धकलेत तिने मिळवलेले हे यश कौतुकास्पद असून, तिच्या जिद्दीची, मेहनतीची आणि कौशल्याची साक्ष देणारे आहे. तिला लाठी-काठीचे प्रशिक्षण प्रशिक्षिका प्रियांका गुंजाळ यांच्याकडून मिळाले.
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळवत गार्गीने आपल्या शाळेचा, पालकांचा आणि रायगड जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळणार असल्याने तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गार्गीच्या या यशामागे तिची मेहनत, प्रशिक्षिकेचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले आहे. तिच्या या दैदीप्यमान कामगिरीबद्दल संस्थेच्या संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका गीतिका भूचर, शिक्षक आणि शिक्षकवृंदासह विविध स्तरांतून तिचे अभिनंदन करण्यात येत असून, बाली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही ती अशीच चमकदार कामगिरी करून देशासाठी यश संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.









