डॉ. संदेश पाटील यांच्या बागेतील आंब्याच्या ९ पेट्या विक्रीसाठी रवाना; कोकणातील आंबा उत्पादकांच्या पंक्तीत रायगडही
अलिबाग (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा उत्पादन म्हटले की प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. मात्र, आता रायगड जिल्हाही आंबा उत्पादनात मागे नसून या दोन्ही जिल्ह्यांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
याचीच प्रचिती १७ नोव्हेंबर रोजी आली. डॉ. संदेश पाटील यांनी आपल्या आंब्याच्या बागेतील उत्पादनाच्या तब्बल ९ पेट्या वाशी येथील आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी रवाना केल्या आहेत. विशेष म्हणजे, प्रत्येक पेटी दोन डझनची असून रायगडच्या आंब्याने बाजारपेठेत आपली उपस्थिती नोंदवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील हवामान, सुपीक जमीन आणि आंबा लागवडीसाठी उपलब्ध असलेल्या पोषक वातावरणामुळे येथील आंबा उत्पादनाला चांगली संधी आहे. डॉ. संदेश पाटील यांच्या या प्रयत्नातून रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्येही नवी उमेद निर्माण होऊ शकते.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या मागे न राहता रायगडही आंबा उत्पादनाच्या क्षेत्रात त्यांच्यासोबत वाटचाल करत असल्याचे डॉ. संदेश पाटील यांच्या बागेतील आंब्याच्या वाशी बाजारपेठेतील रवानीतून अधोरेखित झाले आहे. रायगडच्या आंब्यालाही मोठी बाजारपेठ मिळावी आणि स्थानिक आंबा उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








