रायगडमधील १३ कंपन्यांना उमटे धरण संघर्ष ग्रुपचे साकडे; ४५ वर्षांचा गाळ काढण्यासाठी CSR निधीची मागणी!”


४७ गावे आणि ३३ आदिवासी वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर;

ONGC,JSW, JNPA,Reliance, Sudarshan Chemikal,Tata Power,RCF,GAILसह रायगडमधील १३ कंपन्यांकडे CSR निधीसाठी साकडे!

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न सोडविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी निधीच नसल्याचे कारण दिल्यामुळे उमटे धरण संघर्ष ग्रुपने आता थेट औद्योगिक कंपन्यांचे दरवाजे ठोठावले आहेत. गेल्या सुमारे ४५ वर्षांपासून उमटे धरणात साचलेला गाळ काढण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तब्बल १३ औद्योगिक कंपन्यांकडे CSR/CER निधीतून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे उमटे धरणाच्या प्रश्नाला आता औद्योगिक सामाजिक
उत्तरदायित्वाची जोड मिळाली आहे.

रायगडमधील १३ कंपन्यांना अधिकृत पत्रव्यवहार करण्यात आला असूनदिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी उमटे धरण संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष अॅड. राकेश नारायण पाटील यांनी खालील कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे मदतीची मागणी केली आहे,त्यामध्ये
१)जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, डोलवी
२)रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे
३)सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड, धाटाव
४)गेल (इंडिया) लिमिटेड, उसर
५)राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ
६)ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC), उरण
७)जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA), उरण
८)इनॉक्स एअर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, पाताळगंगा
९)टाटा पॉवर कंपनी लिमिटेड, भिरा
१०)थर्मॅक्स लिमिटेड, पाताळगंगा परिसर
११)रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, पाताळगंगा
१२)महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजेनको), उरण
१३)पीएनपी ,वडखळ,
संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी उमटे धरणाची प्रत्यक्ष पाहणी करावी, परिस्थितीची गंभीरता जाणून घ्यावी आणि CSR/CER निधीतून गाळमुक्तीच्या कामासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उमटे धरणाचा प्रश्न हा केवळ एका धरणाचा किंवा एका गावाचा प्रश्न नसून हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी, शेतकऱ्यांच्या जीवनाशी आणि परिसराच्या पर्यावरणाशी निगडित आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांनी सामाजिक बांधिलकी जपत या प्रश्नात सकारात्मक पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा उमटे धरण संघर्ष ग्रुपने व्यक्त केली आहे.
सन १९७८ मध्ये बांधण्यात आलेल्या उमटे धरणाची मूळ पाणी साठवण क्षमता ८७ दशलक्ष घनफूट इतकी आहे. मात्र, अनेक दशकांपासून गाळ काढण्याचे काम न झाल्याने ही क्षमता घटून सध्या केवळ ३० दशलक्ष घनफूट राहिल्याचे संघर्ष ग्रुपच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच धरणाच्या मूळ पाणी साठवण क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे.

या धरणावर अलिबाग तालुक्यातील ४७ गावे आणि ३३ आदिवासी वाड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे.
उमटे धरणाच्या पाण्यावर अलिबाग तालुक्यातील सुडकोळी, रामराज, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, रेवदंडा, चौल-वरंडे, नागाव आणि आक्षी आदी ग्रामपंचायत क्षेत्रांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज अवलंबून आहे. विशेषतः डोंगराळ भागातील आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे.

जिल्हा परिषदेकडे निधीचा अभाव, मग कंपन्यांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारावी!

उमटे धरणाची मालकी ही रायगड जिल्हा परिषदेकडे आहे,देखभाल दुरुस्ती रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत केली जाते. मात्र, उमटे धरणातील मोठ्या प्रमाणावरील गाळ काढण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नसल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी भर सभेत जाहीर केल्यामुळे तसेच ४५वर्षांचा इतिहास पाहता केवळ शासकीय निधीची वाट न पाहता रायगड जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांनी CSR/CER निधीतून या कामासाठी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका उमटे धरण संघर्ष ग्रुपने घेतली आहे.

आता रायगडमधील या १३ कंपन्या उमटे धरणाच्या पुनरुज्जीवनासाठी कितपत सकारात्मक प्रतिसाद देतात, याकडे संपूर्ण अलिबाग तालुक्याचे लक्ष लागले आहे.

———————————————-
केवळ उमटे धरणातील गाळाचा प्रश्न नाही, तर हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या हक्काचा प्रश्न आहे. उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असताना स्थानिक नागरिकांच्या मूलभूत पाणीप्रश्नासाठीही कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारणे गरजेचे आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्यातील १३ औद्योगिक कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्वातून उमटे धरणाच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घ्यावा,
अँड राकेश नारायण पाटील
उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड,