अलिबाग (अमूलकुमार जैन): अलिबागजवळील वरसोली येथे सॅटेलाईट टॉवरची देखभाल व दुरुस्ती करताना सुमारे २० फूट उंचीवरून खाली पडल्याने गजानन तोतीराम राठोड (वय ४२, रा. मोहपाडा, रसायनी, ता. खालापूर) या टेक्निशियनचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
गजानन राठोड हे भारत इंटरनॅशनल ट्रेड्स कंपनीमध्ये पार्टटाईम सॅटेलाईट टेक्निशियन म्हणून काम करत होते. वरसोली येथील नाईक प्लॉट परिसरातील बूम कॉटेजजवळ असलेल्या सुयोग टेलिमॅटिक प्रा. लि. कंपनीच्या सॅटेलाईट टॉवरची महिन्यातून एकदा देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यानुसार ते कामासाठी आले होते. हेल्मेट आणि सेफ्टी बेल्ट घालून काम करत असताना अचानक त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.








