रायगड (प्रतिनिधी): कर्जत पोलिस ठाण्याच्या पथकाने ९,१८,८०० रुपयांच्या एकूण ४२ मोबाईल फोनांसह २,००,००० रुपये रोकड हस्तगत करण्यात यश मिळवले. ही कारवाई ऑटो डीआर मशीनच्या माध्यमातून करण्यात आली असून, ही मोठी कामगिरी ठरली आहे.
चंद्रकांत माधव अनकले (रा. डोंबाळ, ता. काशार, जि. नांदेड) या आरोपीकडून पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्याविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास सुरु आहे.
कर्जत पोलिस ठाणे हद्दीत नागरिकांच्या तक्रारीनुसार मोबाईल फोन चोरीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. सीईआयआर या पोर्टलच्या मदतीने तपास करण्यात आला. त्यातून आरोपीकडून विविध राज्यांतून चोरी गेलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, झारखंड व तामिळनाडू या राज्यांतून चोरीचे मोबाईल परत मिळाले.
या कारवाईत एकूण ९,१८,८०० रुपयांचे मोबाईल फोन आणि २,००,००० रुपये रोकड असा एकूण ११,१८,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अंशुल दुगल, अपर पोलिस अधीक्षक अनोजित शिवहरे, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप भोळसे, पो.कॉ. सुशांत कदम व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
नागरिकांना आवाहन
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. हॉटेल, धर्मशाळा किंवा प्रवासादरम्यान मौल्यवान साहित्य सुरक्षित ठेवावे. कुठल्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.









