अलिबाग(प्रतिनिधी): नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भगत परिवाराने समाजासाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबविला. कुलदैवत देवीला अर्पण केलेल्या साड्या या वर्षी भगत परिवाराने गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना भेट म्हणून दिल्या. या उपक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
भगत परिवारातील सर्व सदस्यांनी देवीसमोर भक्तिभावाने अर्पण केलेल्या साड्यांचे वितरण करताना समाजसेवेचा संदेश दिला. साड्यांचे वाटप अत्यंत स्नेहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे भगत परिवाराने नवरात्रीच्या उत्सवाला सामाजिकता आणि सेवा भावाची जोड दिली.
साड्या प्राप्त झालेल्या सर्व महिलांनी भगत परिवाराचे मनःपूर्वक आभार मानले आणि हा उपक्रम दरवर्षी सुरू ठेवावा अशी मागणी केली. भगत परिवाराने समाजातील दुर्बल घटकांना मदतीचा हात देत नवरात्रीचा खरा अर्थ – दान, सेवा आणि श्रद्धा – प्रत्यक्षात उतरवला.









