मुंबई – मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि निर्घृण हत्येची घटना अत्यंत गंभीर, संतापजनक व मानवतेला काळिमा फासणारी असल्याचे मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंबावर झालेली मानसिक, सामाजिक व भावनिक हानी अपरिमित असून, त्यांना तात्काळ आधार मिळण्यासाठी शासनामार्फत आवश्यक पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून १० लाख रुपयांची तात्काळ मदत मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे
घटनेची माहिती मिळताच पीडित कुटुंबाला मनोधैर्य योजनेअंतर्गत त्वरित आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी प्रशासनास दिले होते. त्या सूचनेनुसार संबंधित कुटुंबाला रु. १०,००,०००/- (दहा लाख रुपये) इतकी मदत नियम व शासननिर्देशांनुसार मंजूर करण्यात आल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी दिली आहे.
या प्रकारच्या गुन्ह्यांमुळे पीडित कुटुंबावर ओढवणारी वेदना आणि मानसिक आघात अमाप असतो. मंजूर मदत ही केवळ तत्काळ दिलासा देणारी असून वास्तविक झालेली हानी कोणत्याही आर्थिक सहाय्याने भरून न येणारी आहे. तथापि, या कठीण प्रसंगी शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे, असे मंत्री तटकरे यांनी नमूद केले.
यापुढील काळात या प्रकरणाच्या तपास प्रक्रियेत आवश्यक समन्वय, कायदेविषयक मार्गदर्शन, पुनर्वसनासंदर्भातील सहाय्य, तसेच पीडित कुटुंबाच्या रक्षण आणि हिताविषयीच्या सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महिला व बालविकास विभाग पूर्णतः कटिबद्ध असून, संबंधित यंत्रणांना याबाबत सूचना देण्यात आल्याचेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.









