चवदार तळे विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याबाबत दिल्ली येथे महत्त्वपूर्ण चर्चा


नवी दिल्ली (प्रतिनिधी): केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री मा. श्री. रामदासजी आठवले यांची आज दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी रायगडचे राज्यसभा खासदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष मा. श्री. धैर्यशीलदादा पाटील आणि जिल्हा महामंत्री श्री. सतीश धारप यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान रायगड लोकसभा क्षेत्रातील ऐतिहासिक महाड नगरीतील चवदार तळ्याच्या परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्वतंत्र चवदार तळे प्राधिकरण स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या विषयास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदासजी आठवले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने संबंधित प्रशासनास तसेच मा. मुख्यमंत्री महोदयांना आवश्यक निर्देश देण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुंबई भेटीदरम्यान या विषयावर स्वतंत्र बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

याच भेटीत, नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या किमान एक लाख रोजगार संधींचा विचार करता रायगड जिल्ह्यातील उलवे, खारघर व कामोठे परिसरात सुमारे २,००० निवासी क्षमतेचे वसतिगृह उभारण्याची गरज असल्याची आग्रही मागणी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांनी मांडली. यासंदर्भातही ना. रामदासजी आठवले यांनी प्रशासनास महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. संजयजी शिरसाठ यांना आवश्यक सूचना देण्याचे आदेश दिले.

या निर्णयामुळे मुंबई–नवी मुंबई परिसरात नोकरी व व्यवसायासाठी येणाऱ्या मागासवर्गीय समाजातील नागरिकांना अल्प दरात निवासाची सोय उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडित स्थळांचा पंचतीर्थ म्हणून विकास करण्यात भाजप सरकारने पुढाकार घेतला असून, त्याच धर्तीवर चवदार तळ्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या या प्रयत्नांबद्दल मागासवर्गीय समाजाकडून खासदार धैर्यशीलदादा पाटील व जिल्हा महामंत्री सतीश धारप यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत.