खोपोली येथील शिवसैनिकाच्या हत्येचा तीव्र निषेध


अलिबाग (प्रतिनिधी): खोपोली येथील निष्ठावंत शिवसैनिक मंगेश काळोखे यांची राजकीय सुडातून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा शिवसैनिकांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या अमानुष हत्येने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ पोयनाड येथे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “मंगेश काळोखे यांची हत्या ही केवळ एका व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण शिवसेनेवर झालेला हल्ला आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दोषी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे केली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.