मंगेश काळोखे प्रकरणात संपूर्ण देवकर कुटुंबासहित ५ साथीदार जेरबंद


२४ तासांत ९ आरोपींच्या मुसक्या आवळल्या; आरोपींची मदत करणारेही रडारवर

रायगड (प्रतिनिधी): खोपोली शहरात मंगेश काळोखे यांच्यासोबत घडलेल्या अघटित घटनेनंतर सामाजिक व राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती. आरोपी फरार झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस दलाने तातडीने तपासाची सूत्रे हलवली.

पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी ५ विशेष पोलीस पथके स्थापन केली होती. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहितीच्या आधारे समजले की, मोबाईल फोन बंद करून काही आरोपी कोकणाच्या दिशेने, काही मुंबई आणि काही पुण्याकडे फरार झाले होते. तसेच या आरोपींना पळून जाण्यात मदत करणारे आणखी काही संशयितही तपासात समोर आले आहेत.

कौशल्यपूर्ण तपास करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली. अखेर २४ तासांच्या आत फरार मुख्य आरोपी रविंद्र परशुराम देवकर, दर्शन रविंद्र देवकर, धनेश रविंद्र देवकर, उर्मीला रविंद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी धायतडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खराडे आणि दिलीप हरिभाऊ पवार यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात नाव असलेले राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे अद्याप फरार असल्याचे समजते. या जलद कारवाईमुळे खोपोली शहरात तणाव कमी होण्यास मदत झाली असून, पोलीस दलाच्या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.