अलिबाग (प्रतिनिधी): मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आणि युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाड येथील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना (ठाकरे गट)च्या पदाधिकाऱ्यांनी आज अलिबाग येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करत ही मागणी लावून धरली.
महाड नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मतदानाच्या दिवशी झालेल्या राड्यात विकास गोगावले आरोपी असून, या प्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयानेही फेटाळला आहे. सध्या ते फरार असून त्यांच्या विरोधात विविध गुन्हे दाखल असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यांच्या कथित कारवायांमुळे महाड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकास गोगावले आणि त्यांच्या साथीदारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी निवडणुका पूर्ण होईपर्यंत विकास गोगावले व त्यांच्या सहकाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.









