जनसेवेचा वारसा सांगणारे कणखर नेतृत्व: राजाभाऊ ठाकूर


रायगड: काही माणसं काळाच्या पडद्यावर स्वतःच्या कर्तृत्वाने आपली मोहोर उमटवतात. सत्तेपेक्षा सेवेला महत्त्व देणाऱ्या अशा मोजक्या नेत्यांमध्ये रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. राजाभाऊ (राजेंद्र) ठाकूर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. रायगडच्या राजकीय इतिहासात ‘ठाकूर’ परिवाराने समाजसेवेचा जो अखंड यज्ञ सुरू ठेवला, त्या यज्ञाची समिधा बनून राजाभाऊ आज अलिबागच्या जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत.

राजाभाऊ ठाकूर यांना राजकारणाचे बाळकडू काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कै. मधुकर ठाकूर यांच्याकडून मिळाले. शिक्षणाच्या सोयी नसतानाच्या काळात सामान्यांसाठी लढणारे कै. मधुकर ठाकूर हे रायगडचे आधारस्तंभ होते. वडिलांच्या निधनानंतर राजाभाऊंनी केवळ त्यांच नाव लावलं नाही, तर त्यांचा जनसेवेचा वसाही तितक्याच निष्ठेने खांद्यावर घेतला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी दाखवलेली जिद्द आणि अलिबाग हा काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्यासाठी घेतलेली मेहनत, हे त्यांच्या नेतृत्वाचे मोठेपण सिद्ध करते.

नेत्याची खरी परीक्षा संकटाच्या काळात होते. कोरोनाच्या भीषण महामारीत जेव्हा सर्व काही ठप्प झाले होते, तेव्हा राजाभाऊ मात्र शांत बसले नाहीत. लोकांच्या आरोग्यापासून ते त्यांच्या अन्नाच्या सोयीपर्यंत राजाभाऊ प्रत्यक्ष मैदानात उतरले. “जनतेच्या मदतीला धावणारा नेता” ही त्यांची ओळख केवळ भाषणातून नाही, तर त्यांच्या कृतीतून निर्माण झाली आहे. म्हणूनच आजही अलिबाग तालुक्यातील काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता राजाभाऊंच्या पाठीशी एका शिलेदारासारखा उभा राहतो.

राजाभाऊंची निष्ठा आणि अलिबागच्या कानाकोपऱ्यात असलेल्या त्यांच्या जनसंपर्काची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. आगामी रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अलिबाग मतदारसंघातून राजाभाऊ ठाकूर यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. ही केवळ उमेदवारी नसून, अलिबागच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षाने टाकलेला एक मोठा विश्वास आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते, पिण्याचे पाणी आणि युवकांच्या रोजगाराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजाभाऊ आता सज्ज झाले आहेत.

ईव्हीएम पारदर्शकतेचा प्रश्न असो वा प्रशासकीय कामांचा पाठपुरावा, राजाभाऊंचा अभ्यास दांडगा आहे. बॅरिस्टर अंतुले यांच्या विकासवादी विचारांचा वारसा चालवणारे ते एक संयमी पण कणखर नेते आहेत. अलिबागच्या भूमीतील मातीशी नातं सांगणारा हा नेता आता जिल्हा परिषदेच्या सभागृहात सामान्यांचा आवाज उठवण्यासाठी सज्ज झाला आहे.
​राजाभाऊंच्या या पुढील राजकीय प्रवासाला आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील त्यांच्या विजयाला अलिबागच्या तमाम जनतेच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!