विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन
गेल्या १०-१२ दिवसांपासून सुरू असलेला निवडणुकांचा मोठा ‘गाजावाजा’ अखेर काल संध्याकाळी ५ वाजता थांबला. उमेदवारांच्या गाड्या, लाऊडस्पीकरवरची गाणी आणि घोषणाबाजी आता शांत झाली आहे. पण मंडळी, खरी गडबcड तर आता सुरू होणार आहे. ही वेळ आहे शांतपणे विचार करण्याची आणि आपल्या भविष्याचा निर्णय घेण्याची.
निवडणुकीच्या आदल्या रात्री अनेक ठिकाणी पैशांची पाकीटं वाटली जातात. पण विचार करा, आज जर कुणी आपल्याला ५ हजार रुपये दिले, तर ५ वर्षांच्या दिवसांनी त्याचा हिशोब केला तर एका दिवसाची किंमत १ रुपया सुद्धा उरत नाही. मग काय आपण आपल्या भविष्याची किंमत इतकी स्वस्त लावायची का? आज घेतलेले पैसे उद्या संपून जातील, पण चुकीचा माणूस निवडला गेला तर पुढची ५ वर्षं पाण्यासाठी, खराब रस्त्यांसाठी आणि प्रशासकीय कामांसाठी आपल्यालाच पायपीट करावी लागेल.
आपला प्रतिनिधी कसा असावा?
आपलं मत त्यालाच द्या, जो खरंच आपल्या कामाचा आहे. जो माणूस:
सुशिक्षित आहे आणि ज्याला सरकारी योजनांची माहिती आहे.
जो तुमच्या अडचणीच्या वेळी, मग ती रात्रीची वेळ का असेना, तुमचा फोन उचलेल.
ज्याला आपल्या गावच्या खड्ड्यांची, पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या प्रश्नांची जाण आहे.
उद्या ७ तारीख आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. घरून बाहेर पडा आणि विचारपूर्वक मतदान करा. लक्षात ठेवा, आपण कोणा उपकारासाठी नाही तर आपल्या हक्कासाठी मतदान करतोय. आज जर आपण योग्य निर्णय घेतला नाही, तर पुढची पाच वर्षं फक्त तक्रार करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच उरणार नाही.
म्हणूनच म्हणतात अभी नाही तो कभी नाही!चला, आपल्या गावाला आणि तालुक्याला प्रगतीकडे नेणारा योग्य उमेदवार निवडूया.









