अलिबाग (प्रतिनिधी): रायगड जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असला तरी स्पष्ट बहुमतासाठी भाजपच्या पाठिंब्याची गरज भासत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने आधीच भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा केल्याने काहीसा पेचप्रसंग निर्माण झाला होता.
दक्षिण रायगडमध्ये भाजप-राष्ट्रवादी युती तर उत्तर रायगडमध्ये शिवसेना-भाजप अशी स्थानिक पातळीवरील आघाडी पाहायला मिळाली. दक्षिण रायगडमध्ये शिवसेनेला तर उत्तर रायगडमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने सत्तेचे गणित अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री भरतशेठ गोगावले आमदार महेंद्रशेठ दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणांवर चर्चा केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संबंधित भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली असून आगामी काही दिवसांत सत्तास्थापनेबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









