अलिबाग (प्रतिनिधी): विकास गोगावले यांनी जिल्हा परिषद सत्तेसंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करताना तडजोड ही राजकारणातील अपरिहार्य बाब असल्याचे ठामपणे सांगितले. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक तेथे समन्वय आणि तडजोड करावीच लागेल, असे त्यांनी नमूद केले. तिन्ही आमदारांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असून पक्षहिताला प्राधान्य देत पुढील रणनीती आखली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेत शिवसेना चा झेंडा फडकवणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे, असे सांगत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन केले. सत्ता स्थापनेसाठी अंकगणित जुळवताना काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागल्या तरी विकासकामांना गती देणे आणि मतदारांचा विश्वास कायम ठेवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट राहील, असे ते म्हणाले.
जिल्हा परिषदेच्या जागा आपल्या पारड्यात पाडण्यासाठी ‘तडजोडीचा मंत्र’ अवलंबत व्यावहारिक राजकारण करण्याची भूमिका त्यांनी मांडली. स्थानिक पातळीवर संवाद वाढवून सर्व घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून राजकीय वर्तुळात या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू आहे.









