रायगड जिल्हा परिषदेत सत्तासमीकरणांना वेग; गटनेते नियुक्त, सदस्य गोवा सहलीवर


रायगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून संभाव्य सत्तासमीकरण लक्षात घेऊन प्रमुख तिन्ही पक्षांनी संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या पक्षांनी आपापल्या गटनेत्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी मधुकर पाटील, भाजपाच्या गटनेतेपदी वैकुंठ पाटील तर शिवसेनेच्या गटनेतेपदी मानसी दळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे आगामी सत्तास्थापनेदरम्यान समन्वय राखण्यास आणि पक्षांतर्गत एकजूट मजबूत करण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, अध्यक्षपदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्यास नियमानुसार निवडणूक घेण्यात येणार आहे. अशा वेळी तिन्ही पक्षांतील संख्याबळ, आघाड्यांची शक्यता आणि अंतर्गत एकोप्याची कसोटी लागणार आहे. सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू असून वरिष्ठ नेत्यांकडूनही हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेत कोणता पक्ष किंवा आघाडी सत्ता स्थापणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर विजयी झालेले भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आपल्या कुटुंबीयांसह गोवा सहलीवर गेले असल्याची माहिती समोर आली आहे. सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर सदस्यांवर दबाव येऊ नये किंवा राजकीय घडामोडींमध्ये अनपेक्षित बदल होऊ नयेत, यासाठी त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची चर्चा आहे. ९ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर तत्काळ संबंधित सदस्यांनी गोव्याचा रुख केला.
दरम्यान, या घडामोडींमुळे रायगड जिल्हा परिषदेतील राजकारण अधिकच रंगतदार बनले असून पुढील काही दिवसांत सत्तेचे अंतिम समीकरण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.