रायगड जिल्हा परिषदेचा दिव्यांग मुलांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम – निरामय आरोग्य विमा काढण्यसाठी अनुदान – 2025-26 या वर्षांत 144 मुलांना विमा कवच


अलिबाग(प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील दिव्यांग मुलांच्या आरोग्य उपचाराच्या मदतीसाठी रागयड जिल्हा परिषद नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. यामध्ये जिल्ह्यातील ऑटिझम, सेरेबल पॅल्सी, बौद्धिक अपंगत्व आणि बहुविकलांगता या प्रवर्गातील मुलांसाठी दिव्यांग कल्याणच्या 5 टक्के निधीमधून निरामय आरोग्य विमा काढण्यासाठी अनुदान देण्यात येते. त्यानुसार 2025-26 या वर्षांत 144 मुलांसाठी निरामय आरोग्य विमा काढण्यासाठी अनुदान देण्यात आले आहे. या अनुदानाचे पत्र प्रातिनिधिक स्वरूपात 9 मुलांना बुधवारी (ता.18) मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते अलिबाग येथे वाटप करण्यात आले. सन 2024-25मध्ये 105 लाभाथ्र्यांना हे अनुदान देण्यात आले होते.
राष्ट्रीय न्यास, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग भारत सरकार यांनी ऑटिझम, सेरेब्रल पॅल्सी, बौद्धिक अपंगत्व आणि बहुविकलांगता असलेल्या व्यक्तींसाठी सुरू केलेली निरामय आरोग्य विमा योजना वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कव्हर देते. या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवून देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा परिषद कार्यालयात संपर्क साधून नावनोंदणी करता येते. अनेक वेळा दिव्यांग व्यक्तींना अथवा दिव्यांग मुलांच्या पालकांना विमा योजनेसाठी रक्कम भरणे शक्य नसते. त्यामुळे रागयड जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. वाटप कार्यक्रमासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे सहाय्यक सल्लागार साईनाथ पवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

**********
निरामय आरोग्य विमा योजनेमध्ये शस्त्रक्रिया रू. 55 हजार, ओपीडी (नियमित वैद्यकीय तपासणी) रू.15 हजार, दंतचिकित्सेसाठी रू.4 हजार, थेरपीसाठी रू. 20 हजार, पर्यायी औषधांसाठी रू.4 हजार आणि आपत्कालीन वाहन खर्च रू. 2 हजार असे एकूण वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देण्यात येतो. या योजनेसाठी लाभार्थ्यांकडे युडीआयडी कार्ड, आधारकार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ देशभरातील कोणत्याही प्रकारच्या रूग्णालयात घेता येतो.