बंद घराचे कुलूप तोडणाऱ्या चोरट्याला राजपुरीतून ठोकल्या बेड्या


मुरुड (प्रतिनिधी): मुरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वावडुंगी येथे झालेल्या मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १० लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले असून एका आरोपीला अटक केली आहे.

फिर्यादी रामचंद्र सहादेव काते (रा. वावडुंगी, ता. मुरूड) हे २ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आपल्या मुलाकडे मुंबईला गेले होते. या काळात त्यांच्या बंद घराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने कपाटातून ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी १७ फेब्रुवारी रोजी मुरूड पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या कलम ३३१(३)(४) आणि ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अल्तमश निसार शेणवी (वय ३२, रा. पेठ मोहल्ला, मुरूड) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. चोरलेले दागिने त्याने सासरी (राजपुरी) येथील घराच्या पोटमाळ्यावर एका सुटकेसमध्ये लपवून ठेवले होते, जे पोलिसांनी पंचासमक्ष जप्त केले आहेत.

जप्त केलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे:-

​सोन्याच्या चैन:- २ नग (३० ग्रॅम) किंमत ४,२०,०००/- रुपये

​सोन्याचे मंगळसूत्र: -२ नग (१५ ग्रॅम) – किंमत २,१०,०००/- रुपये

​सोन्याचे गंथण: -३० ग्रॅम – किंमत ४,२०,०००/- रुपये

​एकूण किंमत: १०,५०,०००/- रुपये

सदर कारवाई रायगड पोलीस अधीक्षक श्रीमती ऑचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती माया मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात मुरूडचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस उपनिरीक्षक बळीराम केंद्रे, अर्चना मोगरे आणि इतर कर्मचारी सहभागी होते.

घराबाहेर किंवा लग्नसमारंभासाठी जाताना घरात मौल्यवान वस्तू ठेवू नयेत आणि काही संशयास्पद घडल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.