महाड (प्रतिनिधी): सतत होणाऱ्या बदल्या आणि वरिष्ठांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक याला कंटाळून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने आपले जीवन संपवण्याची करण्याची धमकी दिल्याची घटना रायगड जिल्ह्यात समोर आली आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. महत्वाची बाब म्हणजे या निरीक्षकांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून निर्वाणीचा इशारा दिला आहे.
महाड शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक रमेश तडवी कार्यरत आहेत. त्यांनी पोलिस महासंचालकांना अखेरचा इशारा देणारे पत्र दिले आहे. हे पत्र समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तडवी यांची महाड शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक पदावरून अचानक बदली करण्यात आल्याचीही चर्चा आहे. गेल्या दोन वर्षांत २ वेळा बदली झाल्याने मानसिक तणाव वाढल्याचा उल्लेख त्यांनी महासंचालकांना लिहीलेल्या पत्रात नमूद केला आहे. या पत्रात रायगड पोलीस दलातील सर्व प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावांचा उल्लेख केला आहे. त्याच बरोबर महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी मानसिक त्रास तसेच जातीवाचक उल्लेख करून हीन दर्जाची वागणूक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याचे म्हटले आहे.
त्याच बरोबर नगरपालिका निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटात हाणामारी झाली होती. या प्रकरणात मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या प्रकरणात सहकार्य न केल्याने वरिष्ठांकडून त्रास दिला जात असल्याचाही उल्लेख करण्यात आहे. या आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. आता या लेटर बॉम्बची वरिष्ठ पातळीवर काय दखल घेतली जाते हे पहाणे महत्वाचे असणार आहे.









