विजयोत्सवाचा आनंदोत्सव मेळावा रद्द


अलिबाग (प्रतिनिधी) : दक्षिण रायगड भाजपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विजयोत्सवाच्या आनंदोत्सव मेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली असतानाच तो अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. विधानभवनात बॉम्बसंदर्भातील ई-मेल आल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना तातडीने मुंबईकडे रवाना व्हावे लागले. त्यामुळे नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
या मेळाव्यासाठी दक्षिण रायगडमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता. कार्यक्रमासाठी विविध स्तरांवर नियोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विजयोत्सव साजरा करण्यासाठी विशेष तयारीदेखील करण्यात आली होती. मात्र, विधानभवनातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या महत्त्वाच्या घडामोडींमुळे परिस्थितीत अचानक बदल झाला.
याबाबत माहिती देताना दक्षिण रायगड भाजपचे सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांनी सांगितले की, मंत्री रवींद्र चव्हाण यांना तातडीने मुंबईला जावे लागल्याने आणि कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती अपेक्षित असल्याने हा आनंदोत्सव मेळावा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय खा. सुनील तटकरे यांच्या संमतीने घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुढील काळात कार्यकर्त्यांसाठी पुन्हा एकदा विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही पक्षाच्या वतीने देण्यात आली.