अलिबाग (प्रतिनिधी): नाशिकमधील महिला अत्याचारातील आरोपी अशोक खरात (कॅप्टन) प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. या प्रकरणाने महिला सुरक्षा, प्रशासनाची भूमिका आणि राजकीय जबाबदारी यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अशोक खरात यांच्याशी संबंधित गंभीर आरोपांमुळे सामाजिक संताप उसळला आहे. अशातच अशोक खरात या भोंदूबाबाने स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान या मंदिराच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी, अत्याचाराच्या संवेदनशील प्रकरणात महिला आयोगाची भूमिका निष्क्रिय असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अथवा सरकारने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडावे, अशी मागणी शेकापच्या वतीने शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केली आहे.
मागची काही प्रकरणे पाहता चाकणकर यांनी महिलांना न्याय मिळावा, यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली असल्याचे दिसत नाहीत. त्यामुळे न्याय नसेल तर पदावर राहण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही. पीडितेला न्याय मिळावा यासाठी आंदोलने आणि सोशल मीडियावर मोहीम सुरू आहे. या प्रकरणात सरकारने ठोस पावले उचलून पारदर्शक चौकशी करावी, अन्यथा जनआक्रोश आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तींशी संबंध ठेवणे आणि त्याच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, हे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला शोभणारे नाही, अशी टीका त्यांनी केली. महिला सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या पदावर असलेल्या व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असेही चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.





