अलिबाग (प्रतिनिधी) : विकसित महाराष्ट्र 2047 या महत्त्वाकांक्षी ध्येयपूर्तीसाठी पशुसंवर्धन क्षेत्राचा वाटा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनी केले. रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, हवामान आणि उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती लक्षात घेता, येथे पशुपालन व्यवसायाला मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
पारंपरिक शेतीवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून पशुसंवर्धनाकडे वळणे गरजेचे आहे. यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही अत्यंत उपयुक्त ठरत असून, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ आर्थिक अनुदानच मिळत नाही, तर त्यांना उद्योजक बनण्याची संधीही उपलब्ध होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेअंतर्गत दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारख्या विविध व्यवसायांना चालना दिली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन यामुळे पशुपालकांचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात आहे.
रायगड जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. देशपांडे यांनी केले.





