नवी मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या पनवेल आणि नवी मुंबईकरांना आज सकाळी अचानक कोसळलेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला. दमट वातावरण आणि ढगाळ हवामानामुळे पावसाची चाहूल लागत असतानाच, सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पनवेलसह नवी मुंबई परिसरात पावसाने अचानक हजेरी लावली.
या अवकाळी पावसासोबतच ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना अचानक पावसाचा सामना करावा लागला. रेल्वे स्थानके, मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि चौकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दुचाकीस्वारांची विशेषतः गैरसोय झाली. अनेकांनी झाडाखाली, तर काहींनी बसस्टॉप किंवा दुकानांच्या आडोशाला थांबून पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. अचानक आलेल्या सरींमुळे काही ठिकाणी वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली. तर दुसरीकडे, काही नागरिकांनी या पावसाचा आनंद घेतल्याचेही पाहायला मिळाले.
पावसासोबत वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला. मात्र, कार्यालयीन कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि प्रवास करणाऱ्यांना भिजतच आपला प्रवास सुरू ठेवावा लागला. लहान मुलांनी मात्र पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. काही ठिकाणी पावसामुळे किरकोळ पाणी साचल्याचाही प्रकार दिसून आला.
दरम्यान, हवामान विभागाने आधीच काही भागांत उकाडा तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली होती. बदलत्या हवामानाचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवसांतही अधूनमधून हलक्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
एकूणच, आजचा अचानक झालेला पाऊस हा केवळ हवामानातील बदल नसून, उकाड्याने त्रस्त झालेल्या पनवेल आणि नवी मुंबईकरांसाठी सुखद दिलासा ठरला आहे.






