
खोपोली (प्रतिनिधी): मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प परिसरात पुलांवर आणि बोगद्यांमध्ये वाहने थांबविणाऱ्या वाहनचालकांविरोधात महामार्ग पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. वाहतुकीची सुरक्षितता धोक्यात येऊ नये तसेच अपघातांना आळा बसावा, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. विशेषतः बोगदे आणि उंच पुलांवर वाहने थांबवणे अत्यंत धोकादायक ठरत असल्याने पोलिसांनी अशा प्रकारांना अजिबात सहन न करण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या तीन दिवसांत एकूण ९५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून नियमभंगाबद्दल दंड वसूल करण्यात आला आहे. काही वाहनचालक पर्यटनाच्या उद्देशाने अथवा फोटो काढण्यासाठी वाहन थांबवत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, अशा निष्काळजी वर्तनामुळे इतर वाहनांच्या वेगावर परिणाम होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण होते, असे पोलिसांनी नमूद केले.
महामार्ग पोलिसांनी वाहनचालकांना आवाहन केले आहे की, द्रुतगती महामार्गावर कुठेही अनधिकृतपणे वाहन थांबवू नये आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत. ही कारवाई पुढील काळातही अधिक तीव्र करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर पावले उचलली जाणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





