
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) चा निकाल उद्या, शुक्रवार दिनांक ८ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत मंडळाने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजता एकाचवेळी ऑनलाईन पद्धतीने घोषित करण्यात येणार आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल खालील संकेतस्थळांवर पाहता येणार आहे :
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
sscresult.mkcl.org
results.navneet.com
विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालासह गुणपत्रिकेची प्रिंट काढण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा आसन क्रमांक आणि आईचे नाव आवश्यक असणार आहे.
ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयातील गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती तसेच पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे. यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत संकेतस्थळांवरूनच माहिती घ्यावी, असे आवाहन केले आहे.






