
नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबई गुन्हे शाखेने नेरुळ परिसरात मोठी कारवाई करत देहव्यापाराच्या दलदलीत अडकवण्यात आलेल्या चार तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुरू असलेल्या अनैतिक व्यापार आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना ६ मे रोजी गुप्त माहिती मिळाली होती. अन्वर शेख नावाचा इसम ग्राहकांना तरुणी पुरवत असून, तो स्वतः किंवा साथीदारांच्या मदतीने रिक्षामधून मुलींना विविध लॉजमध्ये घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ग्राहकांच्या मागणीनुसार मुली उपलब्ध करून देण्यासाठी तो तब्बल २० हजार रुपये घेत असल्याचेही तपासात उघड झाले.
या माहितीनंतर पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून नेरुळ सेक्टर १४ येथील ‘द ब्लेसफुल स्टे लॉजिंग अँड बोर्डिंग’ येथे पाठवला. ठरलेल्या सांकेतिक इशाऱ्यानंतर रात्री सव्वा अकराच्या सुमारास पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान चार तरुणी आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची तत्काळ सुटका करून त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले.
तपासादरम्यान मोहम्मद हानिफ रजफ ब्यारी, अन्वर आलम इसाक शेख आणि लॉज व्यवस्थापक राजेश सदानंद ढवले यांनी संगनमत करून तरुणींना देहव्यापारासाठी प्रवृत्त केल्याचे समोर आले. या अवैध व्यवहारातून त्यांनी २० हजार रुपयांचा मोबदला स्वीकारल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी नेरुळ पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयाने ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास नेरुळ पोलीस करत आहेत.






