
मुरुड (प्रतिनिधी): मुरुड तालुक्यातील जोसरांजन गावामध्ये श्री बापदेव मंदिराच्या जिर्णोद्धार सोहळ्याचा कार्यक्रम आज अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला नागरिक, महिलावर्ग आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
या पवित्र सोहळ्याचे उद्घाटन मा. विधानपरिषद माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मंदिराच्या जिर्णोद्धारामुळे परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यानंतर व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद अमितदादा नाईक यांनी देखील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी श्री बापदेव महाराजांचे मनोभावे दर्शन घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. मंदिर परिसरातील विकासकामांबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका मांडत भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी मुरुड पंचायत समिती सदस्या आशिका ठाकूर यांच्यासह गावातील मान्यवर, महिलावर्ग, युवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. गावकऱ्यांच्या सहभागातून आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा विशेष आकर्षण ठरला.






