रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस


पनवेल, खारघर, रोहा, सुधागड, खोपोलीत वादळी वाऱ्याचा तडाखा

 रायगड (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची तारांबळ उडवली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, ठिकठिकाणी झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी धुळीचे लोट उठले तर काही भागांत गारांचा पाऊसही झाला.

पनवेल शहरात अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे धुळीचे प्रचंड लोट निर्माण झाले. भर दुपारी परिसर धुरकट झाल्याने वाहतूक संथ गतीने सुरु होती.

खारघर परिसरातदेखील अचानक आलेल्या धुळीच्या वादळाने नागरिकांची दाणादाण उडाली. रस्त्यांवर धुरकट वातावरण निर्माण झाल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली.

रोहा शहरात अचानक सुटलेल्या तुफानी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.

पाली-सुधागड परिसरात दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाली शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता. बाजारपेठेत नागरिकांची धावपळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

खोपोली-खालापूर तालुक्यात मुसळधार पावसासह गारांचा वर्षाव झाला. वावंढळ परिसरात तुफानी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली. काही भागांमध्ये वीजपुरवठाही खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याने पुढील काही तासांतही जिल्ह्यात काही भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.