
रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात शनिवारी दुपारनंतर झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी शेतीपिके, घरांची पडझड, झाडे उन्मळून पडणे तसेच वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून माहिती देताना सांगितले की, नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करून बाधित नागरिकांना त्वरित मदत पोहोचवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच सर्व स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कोणताही धोका निर्माण झाल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. संकटाच्या या काळात शासन नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे असून मदतीसाठी सज्ज असल्याचा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.





