अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग येथे नगर परिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले अश्व ग्लॅन्डर्स तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आयोजित या उपक्रमाला अश्व मालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रायगड जिल्हा पशुसंवर्धन समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितले की, अलिबागमध्ये समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक सेवेसाठी मोठ्या प्रमाणात घोड्यांचा वापर होत असल्याने त्यांची नियमित आरोग्य तपासणी आवश्यक आहे. “बर्कहोल्डेरिया मॅली” या जीवाणूमुळे होणारा ग्लॅन्डर्स हा संसर्गजन्य आजार असून तो मानवामध्येही पसरण्याचा धोका असतो.
शिबिरात तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांनी घोड्यांची सखोल तपासणी केली. रक्तनमुने हिसार (हरियाणा) येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. पशुसंवर्धन विभागाकडून औषधे, जीवनसत्त्वे आणि पूरक आहाराचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच अश्व मालकांना स्वच्छता व आरोग्य निगेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
समारोपावेळी अश्व मालकांना “अश्व आरोग्य कार्ड” देण्यात आले. “पशू आधार” उपक्रमांतर्गत घोड्यांना २० अंकी युनिक ओळख क्रमांक देण्याची माहितीही देण्यात आली. यावेळी डॉ. सचिन देशपांडे यांच्यासह उपनगराध्यक्ष मानसी म्हात्रे, बांधकाम सभापती प्रशांत नाईक, नगर परिषदेचे नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.





