चौलमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला वेग; उर्वरित कामेही लवकरच पूर्ण होणार – डॉ. सचिन राउळ


अलिबाग (प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील चौल गावाच्या विकासकामांना गती मिळाली असून गावातील अनेक गल्ली रस्ते तसेच आळी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. या विकासकामांमुळे नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या चिखल, खड्डे आणि वाहतुकीच्या समस्यांपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राउळ यांनी चौल गावातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, गावातील बहुतांश रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्यांची कामेही लवकरच मार्गी लावण्यात येणार आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांवर विशेष भर दिला जात असून नागरिकांच्या मागणीनुसार विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे.
चौल हे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे गाव असल्याने येथील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे डॉ. राउळ यांनी नमूद केले.
“चौलच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी निश्चितपणे प्रयत्नशील राहीन. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि गावाच्या प्रगतीसाठी विकासकामांचा वेग कायम ठेवला जाईल,” असा विश्वास डॉ. सचिन राउळ यांनी व्यक्त केला.