अलिबाग (प्रतिनिधी): अलिबागचे ॲड. गौतम पाटील यांना थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित 36 व्या ‘वर्ल्ड स्कूल समिट’मध्ये “आऊटस्टँडिंग एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेटर” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक, कायदेविषयक आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत अमेरिकेतील मेरीलँड स्टेट युनिव्हर्सिटी या विद्यापीठाने त्यांना मानद “डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन एज्युकेशन” पदवी बहाल केली. या सोहळ्यात जगभरातील 40 देशांतील मान्यवरांचा सहभाग होता.
वकिली व्यवसायात प्रामाणिकपणा आणि समाजाभिमुख दृष्टिकोन जपत ॲड. पाटील यांनी अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तरुणांना प्रेरणा देणे तसेच क्रीडा व सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे अलिबाग शहरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी हा गौरव कुटुंबीय, सहकारी आणि समाजातील सर्व शुभेच्छुकांना समर्पित करत भविष्यातही समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.






